टॅक्स, इन्शुरन्स आणि फिटनेस संपलेला असतानाही बनावट नंबर प्लेट लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर आरटीओच्या पथकाने कारवाई केली. संबंधित बस पथकाने अडवली असून, वाहनमालकाविरोधात खटला दाखल केला आहे. दंड आणि इतर नियमभंगप्रकरणी वाहनधारकाला नोटीस देण्यात आली असून, साडेदहा लाखांची वसुली करण्यात येणार आहे. या बसधारकाने शक्कल लढवित आपल्या बसची नंबर प्लेट बदलली.
त्यामुळे त्याने नियमभंग केल्यास त्यावर पडलेला ऑनलाइन दंड हा मूळ मालकाला म्हणजेच ज्या बसचा नंबर वापरण्यात आला, त्या व्यक्तीला जात होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मूळ मालक आपल्या बसच्या परमिट नूतनीकरणासाठी आरटीओत आला. त्यांच्या गाडीवर दंड असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या दरम्यान मोटार वाहन निरीक्षक ज्योती जाधव, पद्माकर विश्व, सहायक निरीक्षक सुकन्या काजवणे, नेहा बालसिंग यांच्यासह पथकाने तपासणी करून बस ताब्यात घेतली. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक
बनावट नंबर प्लेट लावून संबंधित वाहनधारक हा या बसमधून पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक करीत होता. बसचा टॅक्स, इन्शुरन्स आणि फिटनेस संपलेला असतानाही ही बस रस्त्यावर धावत होती. दरम्यान, आता आरटीओकडून त्याच्यावर खटला भरण्यात आला असून, साडेदहा लाखांची वसुली करण्यात येणार आहे.