
संपूर्ण राज्यभर गाजत असलेले स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरण हे गुनाट गावाला लागलेला काळा डाग होता. तो डाग मिटवण्याचे काम आरोपीला पकडून देऊन तो मिटविण्याचे काम केल्याचे समाधान मिळाले आहे, असे प्राध्यापक गणेश बापू गव्हाणे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
सुमारे 50 तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या पोलिसांच्या आरोपी शोधमोहिमेत प्रा. गणेश गव्हाणे यांनी गावातील मित्रांसोबत सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रा. गव्हाणे यांना शुक्रवारी पहाटे गुनाट परिसरातील चंदनवस्ती येथे शोध घेताना येथील कॅनॉलच्या बाजूला काहीतरी हालचाल झाल्याचे गाडीच्या लाईटच्या उजेडात दिसले. त्यावेळी हातामध्ये कीटकनाशकाची बाटली घेऊन दत्तात्रय गाडे हा लपून बसला होता. प्रा. गव्हाणे यांनी खात्रीसाठी दुचाकी गाडी आरोपीच्या जवळ नेऊन गाडीच्या लाईटमध्ये पाहणी केली तर तो दत्तात्रय गाडेच होता. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दत्तात्रय गाडे याला पकडला आणि पोलीस पाटील हनुमंत सोनावणे यांना फोन करून सर्व माहिती सांगितली. त्यानंतर पोलीस पाटील व पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले.
प्रा. गणेश गव्हाणे यांच्या प्रसंगावधानाने आरोपीने स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करण्याअगोदरच आरोपी पकडला गेला. त्यामुळे प्रा. गणेश गव्हाणे यांनी साईनाथ वळू, मनोज गव्हाणे, रामदास आखुटे, श्याम वळू, अरविंद घोडके या सहकारी मित्रांना पकडण्याचे श्रेय दिले.
जे झाले ते माझ्या मनाला माहिती आहे. मी सर्व काही पोलीस स्टेशनला गेल्यावर पाहील. मला माझ्या मुलाला भेटायचे आहे. नाहीतर माझ्या घरी एक फोन लावून द्या, अशा प्रकारचे धक्कादायक विधान स्वारगेट बसस्थानक बलात्कारामधील दत्तात्रय गाडे याचे होते, असेही प्रा. गणेश गव्हाणे यांनी बोलताना सांगितले. तसेच दत्तात्रय गाडे याला यावेळी थोडाही पश्चाताप झाला नव्हता, असेही प्रा. गव्हाणे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
आरोपी दत्तात्रय गाडे याने गंभीर गुन्हा केला होता. यामुळे गुनाट गावचे नाव व शिरूर तालुक्याचे नाव बदनाम झाले होते. गावातल्या तरुणाने असा घृणास्पद अपराध केला व संपूर्ण गाव पोलिसांनी वेढले गेले होते. यावेळेस गावाच्या मनात संतप्त भावना होत्या व आरोपीला पकडण्यासाठी गावाने पोलिसांच्या एक पाऊल पुढे जाऊन आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस खात्याला सर्व काही मदत गावाने करून आपल्या गावावर लागलेला डाग पुसण्याचे काम केले आहे, असे पोलीस पाटील हनुमंत सोनवणे यांनी सांगितले.