अख्खं अगरवाल कुटुंब तुरुंगात, आरोपीच्या आईलाही पोलिसांकडून अटक

Pune Porsche car hit and run

कल्याणीनगर ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून देत त्या जागी त्याची आई म्हणजेच शिवानी अगरवाल हिने रक्त दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी शिवानी अगरवाल हिला अटक केली. अगरवाल हिला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वडगावशेरी येथील राहत्या घरातून गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पवयीन मुलाच्या आईला सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा चौकशीअंती अटक करण्यात आली. रेंजहिल्स येथील गुन्हे शाखा युनिट-4 च्या कार्यालयात चौकशीसाठी तिला घेऊन जाण्यात आले. दरम्यान, याबाबत आतापर्यंत पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

अपघातावेळी अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवित होता. रक्त तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मुलाला वाचविण्यासाठी ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्त नमुने डॉक्टरांनी फेकून दिल्याचे उघडकीस आले होते. त्याऐवजी तपासणीसाठी एका महिलेचे रक्त नमुने घेतले होते. त्याच अनुषंगाने शिवानी अगरवाल हिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यामध्ये रक्त तिनेच दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अल्पवयीनाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह एका शिपायाला अटक करण्यात आली होती. या तिघांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचे काम केले. अल्पवयीन मुलाची आई आणि त्याचे बिल्डर वडील या दोघांचा या गुह्यात सहभाग आढळून आल्याने या गुह्यात आता विशाल अगरवाल यालाही अटक करण्यात आली. शुक्रवारी विशाल अगरवाल याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होतीअपघात प्रकरणातील अल्पवयीन चालक बालसुधारगृहात आहे, तर आजोबा सुरेंद्र अगरवाल न्यायालयीन कोठडीत असून आई शिवानी आणि वडील विशाल अगरवाल हे पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात संपूर्ण अगरवाल कुटुंबच गजाआड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उडवाउडवीची उत्तरे, आरोपीकडून चौकशीत सहकार्य नाही
कल्याणीनगर ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील पोर्शे कार चालविणाऱया अल्पवयीन मुलाची शनिवार, 1 जूनला येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात एक तास पोलिसांनी चौकशी केली. यावेळी मुलाची आई, चाईल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आणि गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी त्याच्याकडून अपघाताच्या अनुषंगाने गाडी चालविण्यास कोण होते, ब्लॅक आणि कोझी पबमधील मुलाची उपस्थिती, अपघात केव्हा घडला याबाबत चौकशीत माहिती घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलासह आईने चौकशीत सहकार्य केले नसल्याची माहिती आहे. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मुलाचे वडील, आजोबा, कोझी आणि ब्लॅक पबचे व्यवस्थापक, ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली आहे. त्यानंतर आता मुलाच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.