Pune porche accident – अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल अटकेत

पुण्यातील कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

शिवानी अगरवाल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यात अल्पवयीन चालकाचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र यांना अटक करण्यात आलेली होती. आता या प्रकरणी आई शिवानी हिला देखील अटक केली आहे.

आज दुपारी शिवानी अगरवाल हिला पोलीस न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

वडील, आजोबांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना न्यायालयाने शुक्रवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आता मुलाच्या आईला अटक करण्यात आली. अपघातानंतर मुलाच्या जागी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचा आरोप तिच्यावर आहे.