शाळेतून सुटल्यानंतर 10 वर्षीय चिमुरडी घरी न आल्याच्या पाश्र्वभूमीवर तिच्या शोधार्थ पुणे पोलिसांनी शोधमोहीम राबविली. मुलीने पीएमपीएल बसने केलेला प्रवास, बसचालकाने पोलिसांना दिलेली माहिती अन् खंडणी विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ठोकताळ्याच्या आधारे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास आळंदी देवाची परिसरात मुलीचा शोध घेतला. वडिलांना पाहताच चिमुरडीच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रृंकडे पाहताना पोलिसांनाही कामाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.
श्रावणी रवींद्र गवळी (वय – 10, रा. मोहननगर, धनकवडी) असे शोध घेतलेल्या मुलीचे नाव आहे. शाळा सुटल्यावर श्रावणी 20 डिसेंबरला दुपारी पायी चालत घरी जाताना बेपत्ता झाली होती. पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन मिसिंगची तक्रार दाखल केली. मुलीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके नियुक्त केली.
सीसीटीव्ही फुटेज तपासणे, बातमीदारांकडून माहिती एकत्रित करणे, घातपात विरोधी प्रकाराची शक्यता पडताळून पाहण्यासाठी पथकाने प्राधान्य दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी लीड मिळविले.
मुलगी आळंदीत सापडली
सीसीटीव्ही फुटेजवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी मुलीला हेरले. त्रिमुर्ती चौकातून श्रावणी एका पीएमपीएल बसमध्ये बसल्याचे दिसून आले. एपीआय प्रशांद संदे यांना मुलीचे नातेवाईक आळंदी देवाची परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आळंदी पोलिसांना घटनेची माहिती देत, परिसरात शोधाशोध केली. तोपर्यंत मध्यरात्र ओलांडून गेली होती. एका पादचाऱ्याने मुलगी याच परिसरात असल्याचे सांगितले. काही अंतरावर ती पोलिसांना दिसून आली. काकीने मला इथपर्यंत | आणल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
मोहननगर परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विशेष कामगिरी केली असून, मुलीला सुखरूपरीत्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर