‘डान्स फ्लोअर’ सुरू ठेवण्याचा परवाना नसतानाही मध्यरात्री दीडपर्यंत डीजे आणि डान्स फ्लोअर सुरू ठेवणाऱया रेस्टोबारवर आता पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. शहरात केवळ 24 रेस्टोबारला परवानगी आहे, मात्र अवैधरीत्या रेस्टोबार चालविण्यात येत असल्याने आता पोलिसांकडून कारवाई हाती घेण्यात येणार आहे.
शहरात रेस्टोबार सुरू करण्याचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात येता. मात्र त्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाची एक समिती घेत असते. तसेच या परवान्यासाठी पोलिसांच्या ना-हरकतीची गरज असते, तर ‘डान्स फ्लोअर’ असलेल्या रेस्टोबारला उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांच्या परवान्याचीही गरज असते. अशा प्रकारचे शहर पोलिसांनी आतापर्यंत केवळ 24 परवाने दिले आहेत. त्यातील दोन पबच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे अधिकृतपणे ‘डान्स फ्लोअर’ असलेले 22 पब अधिकृतपणे सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात परवाना नसताना ‘डान्स’ला प्रोत्साहन देणाऱया पबची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. पोलीस आता अशा रेस्टोबारची माहिती संकलित करीत असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आवाजाची मर्यादा ओलांडणे, रात्री रेस्टोबार बंद करण्याच्या वेळेची मर्यादा उलटल्यानंतरही सुरू ठेवणे, रेस्टोबारच्या परिसरात तरुणांकडून गोंधळ घालणे अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. त्या तक्रारींची शहानिशा करून शहर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.