
शेतकऱयांवर पिस्तूल रोखून त्यांना धमकवणाऱया मनोरमा खेडकरला पुण्याच्या पौंड पोलिसांनी आज पहाटे महाडमधून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेली मनोरमा खेडकर महाडच्या हिरकणी वाडीत पार्वती हॉटेलमध्ये इंदुबाई ढाकणे या नावाने लपून बसली होती. याचा सुगावा लागताच पुणे पोलीस मध्यरात्री दोन वाजता महाडमध्ये घुसले आणि त्यांनी सकाळी 6.30 वाजता पाचाडजवळील हिरकणी वाडी गाठत मनोरमा खेडकरला बेडय़ा ठोकल्या.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांनी पौंड तालुक्यात 25 एकर जमीन विकत घेतली होती. मात्र ही जमीन ताब्यात घेताना मनोरमा खेडकर यांनी बाजूची जागा जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न केला होता. याला शेतकऱयांनी आक्षेप घेताच मनोरमा खेडकर यांनी थेट स्वतःजवळील पिस्तूल रोखून शेतकऱयांना धमकावले होते. या वेळी त्यांनी पोलिसांबरोबरही हुज्जत घातली होती. या प्रकरणात पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेच्या भीतीने खेडकर यांनी थेट किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमधील पार्वती हॉटेलचा आसरा घेतला. यासाठी त्यांनी इंदुबाई ढाकणे या नावाची नोंद हॉटेलच्या रजिस्टरमध्ये केली होती. त्यांच्याबरोबर अन्य एक व्यक्ती असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
खुनाचा प्रयत्न; कलम 307 वाढविले
शेतकऱयांवर पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनोरमा खेडकरविरुद्ध कलमवाढ करण्यात आली आहे. नवीन कलमवाढ झाल्यामुळे खेडकरच्या अडचणीत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पौड पोलिसांनी गुह्यात कलम 307 वाढविले आहे. यापूर्वी फक्त धमकावल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. दरम्यान, मनोरमा यांचे पती दिलीप खेडकर यांच्याविरुद्धही धमकाविल्याचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून ते पसार असून त्यांचा शोध घ्यायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. शेतकऱयांना धमकावताना वापरलेले पिस्तूल पुठून आणले आहे, मुळशी तालुक्यामध्ये खेडकर कुटुंबाची नेमकी किती जमीन आहे यासाह इतर माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.
इंदुबाई ढाकणे बनून लपून बसली
मनोरमा खेडकर ही हुंडाई कारने बुधवारी सायंकाळी महाडमध्ये आली होती. मात्र महाडमध्ये आपले बिंग फुटेल या भीतीने तिने किल्ले रायगडजवळील पाचाड गाठले. तेथील पार्वती निवास या हॉटेलमध्ये तिने इंदुबाई ढाकणे अशी ओळख सांगून आपल्यासोबत आपला मुलगा असल्याचे हॉटेलच्या मालकाला सांगितले. मात्र याचा सुगावा पौंड पोलिसांना लागताच पथकाने मध्यरात्री 2 वाजता महाड गाठले.