
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला बस कंडक्टरने मंडळाच्या आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. संजय कुसाळकर असे त्या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती असे समजते. जेव्हा तिने त्यासाठी नकार दिला त्यानंतर तिला निलंबित करण्यात आल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात सुनील धोंडीबा भालेकर व संजय कुसाळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
सदर महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती महिला 2018 पासून पुणे महानगर परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून काम करतेय. पुणे स्टेशन डेपोमध्ये सध्या ती तैनात होती. सुनील भालेकर हा देखील त्याच डेपोमध्ये कामला होता. तो सतत त्या महिलेला त्रास द्यायचा, तिचा पाठलाग करायचा. या प्रकरणी तिने बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र भालेकरने तिला धमकी दिल्यानंतर तिने तक्रार मागे घेतलेली. तिने याविषयी व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर भालेकरची नरवीर तानाजीवाडी डेपोत बदली करण्यात आली. त्यानंतर या महिलेने डेपोचे व्यवस्थापक संजय कुसाळकर यांच्याविरोधात शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार बंड गार्डन पोलीस स्थानकात केली. त्यानंतर तिने राज्य महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार केली. त्यामुळे कुसाळकर यांनी तिला निलंबीत केले होते. त्यामुळे त्या महिलेने कुसाळकर यांच्या कार्यालयात येऊन स्वत:वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.