आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी की महाविकास आघाडी म्हणून लढावी, यासाठी शहरातील कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. कार्यकर्त्यांची तशी मागणी असली तरी याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आमदार अहिर यांनी मंगळवारी (दि. २१) शहरात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते. बैठकीला पुणे जिल्हाप्रमुख, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, मावळ संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, माजी महापौर संजोग वाघेरे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, हाजी दस्तगीर मणियार, तुषार नवले, आबा नखाते आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या निवडणुकीबाबत अहिर यांनी बैठकीत शहरातील विविध विषयांचा आढावा घेतला.
अहिर म्हणाले, ‘पक्षात सहा महिन्यांपूर्वी आलेल्या एकनाथ पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी नेत्यांवर आरोप करणे दुर्दैवी आहे. अशा लोकांना महत्त्व देण्याची गरज नाही. जय- पराजय वेगळा भाग आहे. याने पाडले, त्याने पाडले, हा असा आहे, तो तसा आहे, नेत्यांवर आरोप करणे योग्य नाही. त्यांना त्यांचा मार्ग आहे, तो त्यांनी स्वीकारावा. एकनाथ पवारांनी केलेले आरोप आमच्या कार्यकर्त्यांना आवडलेले नसल्याचेही अहिर म्हणाले.