बीडमधील आमदारावर आरोप अन् अपहरण, पोलिसांची उडाली धावपळ

बीडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारावर गंभीर आरोप करून आमदारावर गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या तरुणाच्याच अपहरणाची तक्रार वारजे पोलिसांकडे आल्याने धावपळ उडाली.

संबंधिताच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून तातडीने चक्रे फिरवली. संबंधित तरुणाच्या मोबाईलचे शेवटचे ‘लोकेशन’ गहुंजे असल्याचे समजले. तांत्रिक तपास करीत पोलीस तरुणापर्यंत पोहोचले. त्याला एका लॉजमध्ये सुखरूप पाहून सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, बनावट अपहरणाच्या या नाट्यामुळे पोलिसांना मनःस्ताप सहन करावा लागला.

मूळचा बीडमधील असलेला सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या एका 35 वर्षीय तरुणाने बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने सत्ताधारी पक्षाच्या एका स्थानिक आमदारावर आरोप केले. त्यांच्याविरोधात पुरावे असून मुख्यमंत्र्यांनी संबंधित आमदाराचा राजीनामा घेऊन कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा 26 मार्चला विधानभवनाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, रविवारी (दि. 23) मुंबईला जातो, असे सांगून तरुण घराबाहेर पडला. सोमवारी सकाळी दहा वाजता या तरुणाने त्याच्या पत्नीला फोन करून ‘काही लोक मला घेऊन चालले आहेत’ अशी बतावणी केली. त्यानंतर तरुणाचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे तरुणाच्या पत्नीने वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.

माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. मध्यरात्रीनंतर संबंधित तरुण शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये सापडला. तेथून तरुणाला ताब्यात घेऊन वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

संबंधित तरुणाला कोणी घेऊन गेलेले नव्हते. त्याने बनाव रचला होता. याबाबत पुढील कार्यवाही केली जात आहे, असे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी सांगितले.