प्रजासत्ताक दिनानिमित्त राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पाली दरवाज्यातून गड उतरत असताना बुरुजाचा दगड डोक्यात कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अनिल आवटे असे मयत तरुणाचे नाव आहे. अनिल पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
अनिल हा मूळचा परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहत होता. रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त अनिल मित्रांसोबत राजगडावर फिरायला गेला होता. गड फिरुन झाल्यानंतर पाली दरवाजाने सर्वजण गड उतरुन खाली येत होते. यावेळी बुरुजाचा दगड कोसळून अनिलच्या डोक्यात पडला. यात तो जखमी झाला.
सहकाऱ्यांनी जखमी अवस्थेत अनिलला तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.