
कँसरमुळे पतीची प्रकृती खालावली. पतीचे वाचणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्याच्या विरहाचे दुःख नको म्हणून पत्नीने आपले जीवन संपवले. पुण्यातील आळंदी येथे ही मन हेलावणारी घटना घडली. यानंतर पतीचेही निधन झाले आणि एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाधर चक्रावार आणि गंगाणी चक्रावार अशी मयत दाम्पत्याची नावं आहेत.
चक्रावार कुटुंब हे मूळचं नांदेडमधील असून कामानिमित्त पुण्यात राहत होते. आळंदी येथील गुरु महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दरबारात ते सेवा करत होते. चक्रावार दाम्पत्याला तीन मुलगे आणि एक मुलगी अशी चार अपत्ये आहेत.
गंगाधर चक्रावार यांना कँसरचे निदान झाले होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कँसरचे उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले. पतीचा अंतिम क्षण जवळ आल्याचे लक्षात येताच पत्नीला विरह नको म्हणून गंगाणी यांनी टोकाचे पाऊस उचलले.
गंगाणी या ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला जाते सांगून घरुन गेल्या. ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी इंद्रायणी नदीत उडी घेतली. मृत्यूपूर्वी त्यांनी मी देवदर्शनाला जात असल्याचे स्टेटस व्हॉट्सअपला ठेवलं. पत्नी घराबाहेर पडताच पतीने अखेरचा श्वास घेतला. दर्शनाला गेलेली आई घरी न परतल्याने मुलांनी शोधाशोध केली असता इंद्रायणी नदीत महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.