Pune News – इंदापूरात पोलिसांची धडक कारवाई, 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत

इंदापूर तालुक्यातील न्हावी गावामध्ये शेतीमालात अमली पदार्थ निर्मीतीसाठी विनापरवाना अफुची लागवड करणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची चाळीस गोण्या बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आली. अमली पदार्थ निर्मितीसाठी विनापरवाना आफुची शेती करणारे रतन कुंडलिक मारकड (50), बाळु बाबुराव जाधव (54), कल्याण बाबुराव जाधव (65) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत असताना शुक्रवार (21 फेब्रुवारी 2025) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे न्हावी (ता. इंदापूर जि. पुणे) गावच्या हद्दीत रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव या आरोपींनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड व विक्री करण्याच्या उद्देशाने उत्पादन घेतले आहे, अशी बातमी मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरील आरोपींच्या शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये म्हणून संबंधित आरोपींनी शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चोहू बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेतले होते. कारवाई दरम्यान एकूण 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे डि.वाय.एस.पी सुदर्शन राठोड, यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर स.पो.नि. राजकुमार डुणगे, स.पो.नी कुलदीप संकपाळ, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव यांसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.