
मुलाशी भांडण केले म्हणून संतापलेल्या मामाने अल्पवयीन भाच्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. मेघनाथ अशोक तपासे असे आरोपी मामाचे नाव आहे. सिंहगड रोडवरील नऱ्हे भागात ही घटना घडली.
अल्पवयीन भाचा मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. तो पुण्यात मामाकडे रहायला गेला होता. यावेळी त्याचं मामाच्या मुलासोबत किरकोळ भांडण झालं. या भांडणातून मेघनाथने भाच्याला आधी पट्ट्याने मारहाण केली. मग चाकूने छातीवर वार केले. यात भाचा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसात मामाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.