सीना नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोन परप्रांतीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बोपले (ता. मोहोळ) येथे बुधवारी उघडकीस आली. शंकर जीवनलाल बिरणवार (वय 19), सत्यम मीताराम गईगई (15, दोघे रा, हट्टा रा. पाथरी किरणापूर, मध्य प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
रविवारी (दि.2) दिवसभर काम करून सायंकाळी शंकर बिरनवार, सत्यम गईगई, सुरेश राकेश मेश्राम, रवींद्र अनिल राऊत हे सीना नदीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. त्यानंतर काही वेळातच सूरज मेश्राम आणि रवींद्र राऊत यांनी शंकर व सत्यम पाण्यात बुडाल्याची माहिती दिली होती. याबाबत पोलीस, तलाठी यांना माहिती मिळाल्यानंतर दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते आढळून आले नव्हते.
काल बुधवारी नदीपात्रात असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळ शंकर बिरणवार याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्यांनी सत्यमचा शोध घेतला असता, पाण्यात बुडालेल्या ठिकाणापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर सत्यमचा मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समाधान पाटील आणि धनाजी घोरपडे तपास करीत आहेत.