
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत हिंदुस्थानात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात सध्या 111 पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. यात दीर्घ मुदत व्हिसा आणि व्हिजिटर व्हिसावर आलेल्यांचा समावेश आहे. यातील स्वच्छेने तिघांनी पुणे पोलिसांकडून परवानगी घेत देश सोडला आहे.
पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. गोळीबारात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्यात आले आहे. त्या मार्गे आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात परतण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील आढावा घेतला असता, पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून मिळाली. यातील सुमारे 91 जण हे दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तर, उर्वरित 20 जण व्हिजिटर व्हिसावर (45 किंवा 90 दिवस) हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. हे नागरिक प्रामुख्याने नातेवाईक भेटीसाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी आलेले आहेत. हिंदुस्थानात प्रवेश केल्यानंतर परदेशी नागरिकांना स्थानिक पोलीस ठाण्यात तसेच पोलीस आयुक्तालयात नोंदणी करणे बंधनकारक असते. तसेच एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीदेखील परवानगी घेणे आवश्यक असते. पोलीस विभाग वेळोवेळी त्यांच्या वास्तव्याची व हेतूची पडताळणी करतो. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असून, अद्याप परराष्ट्र मंत्रालय किंवा मुंबई परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून कोणतेही अधिकृत निर्देश मिळाले नसल्याने पुढील कार्यवाही केलेली नाही.