
वाडागाव (ता. शिरूर) येथील तीन बालकांचे युवकाने अपहरण करून एका बालिकेचा खून करून मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या प्रकरणाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून, शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे.
गायत्री रणजित कुमार रविदास (वय 7, रा. वाडागाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. झारखंड) असे विहिरीत मृतदेत आढळलेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी बबन रामपीर यादव (वय 42, रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडागाव येथील गायत्री, कार्तिक रविदास आणि अभिजित पासवान (दोघे वय 3) हे तिघे शनिवारी (दि. 22) बेपत्ता झाले. याबाबत विनादेवी रणजितकुमार रविदास या महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, निरीक्षक दीपरतन गायकवाड, अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, हवालदार आत्माराम तळोले, रोहिदास पारखे, नवनाथ नाईकडे, किशोर तेलंग, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल दांडगे, औदुंबर वाघमारे, ललित चक्रनारायण आदींनी बालकांचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बबन यादव हा दुचाकीहून तिघा बालकांना घेऊन गेल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती करून अपहृत बालकांचा शोध सुरू केला. यातील तीन व चार वर्षीय चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) येथे असल्याचे समजल्यावर हे शोधपथक दोन्ही मुलांपर्यंत पोहोचले व दोघांनाही ताब्यात घेतले.
दरम्यान, बबन यादव याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वरील तीन बालकांचे अपहरण केल्याची कबुली दिली आणि यापैकी दोघांना बहुळमध्ये सोडले, तर गायत्रीला विहिरीत टाकल्याची माहिती दिली. त्यानुसार सर्च ऑपरेशन करून बहुळ येथील विहिरीतून मयत गायत्रीचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली.
म्हणून केले अपहरण
अपहृत तीनही बालके, त्यांचे कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय असून, मृत गायत्रीच्या मावशीशी आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र, त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तीनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहिरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले.