गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू

भाजपचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याच्या कथित प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तुषार खरात या पत्रकाराला अटक केली गेल्याबद्दल संबंधित पीडित महिलेने खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘तोंड बंद ठेव, नाहीतर तुषार खरातची जी हालत केली, ती तुझीपण करू,’ अशा धमक्या आपल्याला येत असल्याचे या महिलेने म्हटले आहे. ‘तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून सत्याचा आवाज दाबणार का?’ असा जळजळीत सवालही तिने केला आहे.

‘तुषार खरात यांनी माझी बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने लावून धरली होती; पण मला काही करू शकत नाहीत म्हणून त्यांनी खरात यांना खंडणीच्या गुह्यात अटक केली, जो त्यांनी केलेलाच नाही. माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोंड बंद कर, नाहीतर तुषार खरातची जी हालत केली, ती तुझीपण करू, अशी धमकी देऊन मला घाबरवले जात आहे. म्हणजे तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही सत्याचा आवाज दाबणार का?’ असा सवाल पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणामुळे मंत्री जयकुमार गोरे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पीडित महिलेविरुद्धच काही ठिकाणी आंदोलने करणाऱ्या भाजप महिला मोर्चाला पीडित महिलेने परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘मी स्वाभिमानी आणि संघर्ष करणारी महिला आहे. भाजपच्या महिला माझ्याविरुद्ध वक्तव्ये करत आहेत. त्यांनी अशी वक्तव्ये करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करायला हरकत नव्हती. ती केली असती तर या सर्व महिला आज माझ्यासोबत उभ्या राहिल्या असत्या,’ असे त्या म्हणाल्या.