
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ससून रूग्णालयाच्या समितीने चौकशी अहवाल पुणे पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला आहे. या समितीने आपल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नसल्याचं सांगण्यात येत आहे. यातच पोलिसांनी अहवालातील चार मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणानंतर दीनानाथ रूग्णालयाविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्तांची समिती आणि महापालिका आरोग्य विभागाची माता-मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यात आली होती. या समित्यांनी चौकशी करून अहवाल राज्य सरकारला सादर केले आहेत.