
बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे.
पुण्यात विमानतळ येथे दाखल झाल्यानंतर कासले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. एन्काऊंटरचा आदेश तुम्हाला दिला होता का? यावर त्यांनी कोणी असा एन्काऊंटरचा आदेश देईल का? या चर्चा बंद दाराआडच्या आहेत. मी जे पुरावे सादर करतोय, त्याबाबत विचारा. ज्यादिवशी मतदान होतं, त्यादिवशी ईव्हीएम छेडछाडीबद्दल गप्प राहण्यासाठी माझ्या बँक खात्यात 10 लाख रुपये पाठविण्यात आले, असा गौप्यस्फोट कासले यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधिकारी कराडचे हस्तक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कासले म्हणाले, संत बाळूमामा कंन्स्ट्रक्शन कंपनी वाल्मीक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर 10 लाख रुपये आले आहेत. त्यापैकी साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे.
धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले
मला 10 लाख आले, तेव्हा माझ्या बँक खात्यात 416 रुपये होते. ईव्हीएमपासून दूर जायचं. ईव्हीएमला छेडछाड होईल ते सहन करायचं. तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये दिले होते. परळीला माझी ड्युटी होती. तिथे अपुरं मनुष्यबळ होतं, असे अनेक प्रश्न उपस्थित करणारी माहितीही कासले यांनी दिली. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.