
गर्भवती तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला असून, त्यामध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मात्र ससूनच्या अहवालात स्पष्टता नसल्याचे कारण देत पुन्हा नव्याने चार मुद्द्यांवर ससूनकडून नव्याने अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, डॉ. घैसास यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिले आहे.
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने चौकशी अहवाल पुणे पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला आहे. या अहवालामध्ये डॉक्टरांसह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला नसल्याची माहिती आज समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली किंवा कसे यावरून चर्चा सुरू झाली आहे. ससून रुग्णालय समितीने पुणे पोलिसांना पाठवलेल्या सहा पानी अहवालात संबंधित महिलेच्या उपचारावेळी वैद्यकीय हयगय झाली, डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असे कोठेही नमूद नाही. त्यामुळे डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आता चार मुद्दे उपस्थित करून पुन्हा ससून रुग्णालय कमिटीकडे अभिप्राय मागितला आहे.
आरोग्य विभाग, धर्मादाय समितीच्या अहवालात दोषी
आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्त समितीने दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांच्यावर ठपका ठेवला असल्याचे समोर आले आहे. तर मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल गुलदस्त्यात आहे. तसेच या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.