Pune News बांगलादेशी घुसखोरांना अभय कोणाचे? पुणे जिल्ह्यासह शहरात बेकायदेशीर राहणार्‍यांची संख्या वाढतेय

>> नवनाथ शिंदे

पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागात राहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांना अटक पोलिसांना यश आले आहे. मात्र, संबंधित बांगलादेशींना मतदानकार्डपासून, रहिवाशी पुरावा, राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत अभय देणार्‍यांविरूद्धही कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने एमआयडीसी परिसरासह उपनगरांमध्ये छुप्या पद्धतीने बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत तपास यंत्रणांसह सुरक्षा विभागाला आव्हान निर्माण करीत आहेत.मागील काही दिवसांपासून बांगलादेशीविरूद्ध पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेउन अशा घुसखोरांना अभय देणे टाळले पाहिजे.

शिक्षण, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी पुण्यासह उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात परप्रांतीय नागरिकांना ओढा वाढला आहे. त्याचाच फायदा घेउन बांगलादेशी नागरिकही छुप्या पद्धतीने हिंदुस्थानमध्ये प्रवेश करून पुण्याकडे धाव घेत असल्याचे कारवाईवरून दिसून आले आहे. बांधकाम व्यवसाय, खासगी कंपनीत कामासह मिळेल त्या रोजंदारीवर पैसे मिळवित घुसखोर उपजिवीका भागवित आहेत. मात्र, कोणतीही परवाना न घेता, विना पासपोर्ट, व्हिसा हिंदुस्थानात प्रवेश करीत बांग्लादेशींनी तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे देशातंर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. रोजंदारीच्या आडून स्थानिक भागातील रेशनकार्ड, मतदानकार्ड मिळवून काही बांग्लादेशी आता हिंदुस्थानी नागरिक म्हणून मिरवत आहेत. त्यांचाही ठावठिकाणा शोधून पुन्हा त्यांना त्यांच्यात देशात माघारी पाठविणे अत्यावश्यक आहे.

पुण्यासह उपनगरातील काही एजंटाकडूनही पैशांसाठी बांग्लादेशीना थेट कागदपत्रांची उपलब्धता करून दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकदा कागदपत्रे तयार झाल्यानंतर संबंधित लोक १० वर्षांपासून जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात राहत असल्याचे कारवाईवरून दिसून आले आहे. बेकायदेशिररित्या वास्तव्य करणार्‍या २१ बांग्लादेशी नागरिकांना नुकतीच अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकासह रांजणगाव पोलिसांना यश आले आहे. संबंधित बांग्लादेशी मागील सहा महिने ते 10 वर्षांपासून रांजणगावातील कारेगाव परिसरात राहायला होते. इमारत बांधकामासाठी ते बिगारी काम करीत होते. त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदानकार्ड आढळून आल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. पारपत्र कायदा, तसेच परकीय नागरिक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय 27, रा. पश्चिम कोलागासिया, बांगलादेश) हिला ताब्यात घेतले आहे. मुसलमिया 3 डिसेंबरला पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहाजवळ असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. हद्दीत गस्त घालणार्‍या पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने तिची चौकशी केली. तेव्हा ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र, तसेच हिंदुस्थानात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. एजंटाच्या मध्यस्थीने तिने देशात बेकायदा प्रवेश केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, वर्षभरापूर्वी बुधवार पेठेत वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह दलालांना ताब्यात घेतले होते. तर नोकरीचे आमिष दाखवून महिलांना वेश्याव्यवसायास बांग्लादेशी महिलांना प्रवृत्त केल्याचीही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली होती.

हिंदुस्थानात असा मिळविला जातोय प्रवेश

हिंदुस्थान- बांगलादेश सिंमा ओलांडुन कोणताही वैध्य पारपत्र परवाना धारण न करता बांगलादेशींकडून प्रवेश मिळविला जातो. हिंदुस्थानातील बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून ते राहतात. एजंटाकडून बनावट आधारकार्ड,पॅनकार्ड, मतदानकार्ड तयार केले जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह एजंटांनी काही रक्कमेच्या लालसेपोटी घुसखोरी करणार्‍या बांगलादेशींना थारा न देणे आवश्यक आहे.

एमआयडीसी परिसरात बिगारीची कामे

बांग्लादेशातून आल्यानंतर एमआयडीस्ी परिसरात बिगारी काम करणे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींचे प्लॅस्टर करणे, वाळू-वीटांची वाहतूक करण्याची कामे केली जातात. त्यानुसार घुसखोर नागरिक उदरनिर्वाह करतात. त्यांची कोणतीही माहिती न घेता संबंधितांना कामावर ठेवले जाते.