‘दीनानाथ’ने पैशांसाठी उपचार नाकारल्याने गर्भवतीचा मृत्यू, पुण्यात रुग्णालयातही माणुसकी मेली

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल. तीन लाख रूपये भरण्याची तयारी दाखवली. परंतु, दहा लाख रूपये आगाऊ भरल्याशिवाय उपचार करणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. त्यामुळे महिलेला दुसऱया रूग्णालयात हलवावे लागले. या गोंधळात महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, महिलेचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरु करण्यासाठी मंत्रालयातून फोन येऊनही रूग्णालयाने प्रवेश नाकारल्यामुळे पुण्यात रूग्णालयातही माणुसकी मेली की काय? अशा शब्दात संताप व्यक्त होत आहे.

तनिषा भिसे यांना बुधवारी प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणले होते. मात्र, क्रिटीकल शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णालयाने तत्काळ दहा लाख रुपये भरण्यास सांगितले. आम्ही अडीच लाख रुपये आता भरतो, उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे नातेवाईकांनी सांगितले. परंतु, प्रशासनाने ऐकले नाही. त्यामुळे तनिषा यांना दुसऱया रुग्णालयात हलवले. रूग्णालयाच्या मुजोरपणामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

रागाच्या भरात अर्धवट माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आम्ही याबाबत उद्या सरकारला सविस्तर माहिती देणार आहोत. – डॉ. धनंजय केळकर, संचालक, दीनानाथ मंगेशकर रूग्णालय