शहरातील सर्व भंगार दुकानांवर कारवाई करणार, पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली, कुदळवाडीतील पाच हजारांवर भंगार दुकाने आणि गोदामांवर ज्याप्रकारे सरसकट अतिक्रमण हटाव कारवाई केली, त्याच प्रकारे शहरातील काळेवाडी, पिंपरी, वाल्हेकरवाडी, सांगवी आदी भागातील भंगार व्यावसायिकांवरही शंभर टक्के कारवाई करण्यात येणार आहे. शहरात एकालाही भंगार व्यवसाय करू दिला जाणार नसल्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात व अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सिंह म्हणाले की, ‘तळवडेतील कारखान्यात तसेच कृष्णानगर येथील एका हार्डवेअरच्या दुकानात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्या आगीच्या घटनेनंतर महापालिकेने शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण केले. त्यात कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार आयुक्त, महापालिका तसेच अग्निशमन विभागाचे कोणतेही परवाने नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडतात.

तसेच वायू व जलप्रदूषण होत आहे. महापालिका व एमआयडीसी माणुसकीच्या नात्यातून तेथे पाणीपुरवठा करीत आहे. अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर महापालिका काहीच कारवाई करत नाही, अशी टीका वेळोवेळी आमच्यावर सातत्याने होत होती. त्यामुळे कुदळवाडीत कारवाई केली. त्यात कोणताही राजकीय दबाव नाही. त्या कारवाईनंतर शहरातील सर्व भंगार व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे. काळेवाडी, पिंपरी, वाल्हेकरवाडी, सांगवी यांसह सर्व ठिकाणी भंगार दुकाने व गोदामावर 100 टक्के कारवाई केली जाईल. शहरात एकही भंगार व्यावसायिक ठेवला जाणार नाही.

निळ्या पूररेषेतील बांधकामांवरही करणार कारवाई

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामेही पाडण्यात येणार आहेत. नव्याने झालेली बांधकामे आणि व्यापारी बांधकामे व पत्राशेडवर प्रथम कारवाई करण्याचे महापालिकेने नियोजन केले असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

शहरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार

बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर दहावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मनपा हद्दीतील परीक्षा केंद्रांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सहायक आयुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भरारी पथकांमार्फत मनपा हद्दीतील संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देऊन काही गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.