पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी अर्धवट जळालेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ल्याचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीत मानवी मृतदेह जाळण्याची जबाबदारी असलेल्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे मृतदेह पूर्ण जळत नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने ते मृतदेहाचे तुकडे नसल्याचा दावा केला आहे. शहरातील सर्वांत मोठी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. स्मशानभूमीत मानवी मृतदेह जाळण्याची जबाबदारी असलेल्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे मृतदेह पूर्ण जळत नसल्याचा आरोप केला जात आहे. स्मशानभूमीत मृतदेह जळाल्यानंतर देखरेख आणि सुरक्षिततेची योग्य व्यवस्था नाही, त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या भागातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यास सुरुवात केल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी सारिका फुंडे-भोसले यांनी सांगितले.
मृतदेहाची दररोज विटंबना; चौकशी करून कारवाई करा
नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी अर्धवट जळालेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मे. निकिता बॉयलर ठेकेदार कंपनी यांच्या बेजबाबदार कारभारामुळे मानवी मृतदेह पूर्ण जळत नसल्यामुळे व त्यांच्या दुर्लक्षामुळे भटक्या कुत्र्यांकडून रोज हा प्रकार सुरू आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या मे. निकिता बॉयलर ठेकेदार कंपनीवर त्वरित कारवाई करावी. दरम्यान, मानवी देहाचे तुकडे नसल्याचा महापालिकेचा दावा योग्य नाही. या संदर्भात चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी केली आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही मानवी शरीराचा जळालेला भाग कुत्र्यांनी पळविला नाही. तर, कुत्र्यांनी पावाचा तुकडा आणि एक नारळ नेल्याचे समोर आले आहे. अधिक माहितीसाठी तेथील सीसीटीव्ही तपासण्यात येतील.
मनीषा शेकटकर, विद्युत विभागप्रमुख, महापालिका.