दोन महिला पोलीस कर्तव्यावर असताना त्यांना एक गरोदर महिला प्रसूतीदरम्यानच्या असह्य वेदनांनी ओरडत असल्याचे दिसून आले. तिची अवस्था लक्षात घेऊन महिला पोलिसांनी तातडीने धाव घेत तिला आडोशाला नेले. डॉक्टर व रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका येईपर्यंत महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना रविवारी (1 डिसेंबर रोजी) दुपारी चारच्या सुमारास वाकड नाका येथे घडली. महिला पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोघींचा सत्कार केला.
राजश्री माधव वाघमारे (वय – 25) असे सुखरूप प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस हवालदार नीलम विजय चव्हाण व पोलीस अंमलदार रेश्मा नजीर शेख अशी कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली.
हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस हवालदार नीलम चव्हाण व पोलीस अंमलदार रेश्मा शेख या दोघी वाकड नाका येथे कर्तव्यावर होत्या. दुपारी चारच्या सुमारास त्यांना एक गरोदर महिला प्रसूतीदरम्यानच्या असह्य वेदनांनी ओरडत असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दोन्ही महिला पोलिसांनी तिला आडोशाला नेले. तेथून 108 क्रमांकावरून रुग्णवाहिकेशी संपर्क केला.
मात्र, रुग्णवाहिका येण्यास 20 मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत राजश्री वाघमारे यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरने बाळ आणि बाळंतीण यांची तपासणी केली. ते दोघेही सुखरूप असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना औंध रुग्णालयात नेण्यात आले.
महिला पोलीस हवालदार नीलम चव्हाण व अंमलदार रेश्मा शेख यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त बापू बांगर यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे हेदेखील उपस्थित होते.