पुण्यातील स्पोर्ट्स विंग ब्रम्हाकुमारीजच्या वतीने ऑलिम्पिक पदक पूजन व परिसंवादाद्वारे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पुण्याच्या बाबू निमल यांनी 1936 साली जिंकलेल्या बर्लिन ऑलिम्पिकमधील पदकाचे पुजन करून बाणेर येथील ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्राने समारंभाची मोठ्या उत्साहात सुरुवात केली. याप्रसंगी हिंदुस्थानचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, ऑलिम्पिकपटू बाळकृष्ण अकोटकर यांनी आपली ऑलिम्पिक यशोगाथा सांगितली. तसेच रितू ठक्कर, माऊटआबू येथील स्पोर्ट्स विंगच्या आदिती, जगबीर यांनी मनाच्या शक्तीसाठी राजयोग ध्यान व सकारात्मक विचार या विषयांवर खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी उपसंचालक सुहास पाटील, भाग्यश्री बिले, क्रीडा संघटक अजीत निमल, दत्तात्रय कळमकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुण्यातील 210 राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पदकविजेत्यांसह शिवछत्रपती क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंनी सहभागी घेतला होता. राष्ट्रीय पदक विजेते क्रीडापटू काजल माने, अक्षय जाधव, क्रीडा मार्गदर्शक संजोग ढोले, धीरज मिश्रा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ऑलिम्पिक दिननिमित्त पुण्यात खेळाडूंसाठी प्रथमच निशुल्क ध्यान व मोटिव्हिशनल काऊन्सलिंग केंद्राचे उद्घाटन ऑलिम्पिकपटू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील खेळाडूंना रोज संध्याकाळी 6 ते 8 यावेळेमध्ये या केंद्रात मार्गदर्शन देण्यात येणार आहे.