
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोची सहा स्टेशन आहेत. त्यापैकी भोसरी आणि पीसीएमसी या दोन स्टेशनची नावे चुकीची असल्याने ती नावे बदलण्याची मागणी होत आहे. त्याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कासारवाडी येथील नाशिक फाटा स्टेशनचे नाव महामेट्रोने भोसरी असे ठेवले आहे. त्या स्टेशनपासून भोसरी हे ठिकाण सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. या चौकातच कासारवाडी रेल्वे स्टेशन तसेच पीएमपीएलचा नाशिक फाटा नावाने बीआरटीएस थांबा आहे. असे असताना महामेट्रोने या स्टेशनला चुकीचे नाव दिल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांची फसगत होत आहे. हे नाव बदलण्याची मागणी मेट्रो सुरू होण्यापूर्वीपासून होत आहे. मोरवाडी, पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात मेट्रोचे पीसीएमसी स्टेशन आहे.
पीसीएमसी याचा अर्थ पिंपरी चिंचवड महापालिका असा आहे. मात्र, ते नाव पिंपरी-चिंचवड महापालिका भवन असा असायला हवा होता. या चौकात मोरवाडी चौक असा बीआरटीचा बसथांबा आहे. स्टेशनला पीसीएमसी नावामुळे प्रवाशांमध्ये पिंपरी-चिंचवड शहर असा संभ्रम निर्माण होत आहे. त्यात पिंपरी की चिंचवड अशी फसगत होत आहे. पीसीएमसी नाव बदलून थेट पिंपरी मेट्रो स्टेशन असे असावे, अशी मागणी आहे. मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांत या स्टेशनवरून महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भोसरी आणि पीसीएमसी दोन स्टेशनची नावे बदलण्याबाबत महामेट्रोकडे अनेक संघटना आणि संस्थांकडून अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, महामेट्रोकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातून मेट्रोचा प्रवास
■ पिंपरी ते फुगेवाडी : 6 मार्च 2022
■ पिंपरी ते सिव्हिल कोर्ट : 1 ऑगस्ट 2023
■ पिंपरी ते स्वारगेट: 21 सप्टेंबर 2024
■ सहा स्टेशन : पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी.
पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो या नामविस्ताराला केराची टोपली
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो धावत आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्वतंत्र शहर आहे. त्याचा नावलौकीक देशभरात वाढत आहे. त्यांची ओळख वेगळी आहे. त्यामुळे पुणे मेट्रोऐवजी पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो असा नामविस्तार करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामेट्रोकडे केली होती. तसा ठराव महापालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. महामेट्रो प्रशासनाने दुजाभाव करीत त्या मागणीस केराची टोपली दाखविली आहे.
राज्य सरकारच्या मंजुरीनंतर भोसरी हे नाव बदलणार
भोसरी मेट्रो स्टेशनचे नाव बदल्याबाबत महामेट्रोकडे पत्र आले आहे. मात्र, पीसीएमसी नावाबाबत कोणतेही पत्र नाही. महामेट्रोच्या एका समितीकडून तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर त्याबाबत गॅझेट प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर त्या स्टेशनचे नाव रीतसरपणे बदलण्यात येईल, असे महामेट्रोचे संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.