ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी, पुण्यात गडकरींचं विधान

ज्या कंपन्यांमध्ये सरकारने हात घातला त्यांचा सत्यानाश झाला असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले. तसेच ज्याचा राजा व्यापारी असतो त्याची जनता भिकारी असते, असेही गडकरी पुढे म्हणाले. ‘सकाळ’ समूहाचे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 127 व्या जयंतिनिमित्त शुक्रवारी पुण्यातील बालगंधर्व मंदिरात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नितीन गडकरी यांनी ‘पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचे भवितव्य’ या विषयावर भाष्य केलं.

स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला मोठमोठ्या कंपन्या सरकारने काढल्या. प्रत्येक क्षेत्रात सरकारचा सहभाग होता. पण नंतर लक्षात आले की ज्याचा राजा व्यापारी असतो त्याची जनता भिकारी असते. सरकारचा हात एवढा अशूभ आहे की जिथे हात लागला तिथे सत्यानाश झाला. त्यामुळे मुलभूत गरजा आणि शेतीच्या प्रश्नांना प्राथमिकता मिळाली नाही, असे वक्तव्य गडकरी यांनी केले.

पुणे-मुंबई प्रवास 9 तासांवरून दोन तासांवर आला आहे. बीओटी तत्त्वावर रस्ता बांधायला दिला नसता तर त्याला 25 वर्षे लागली असती. सरकारचा हस्तक्षेप कमी केल्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळाली, असे गडकरी यांनी पुढे नमूद केले.

आता दिल्ली-मुंबई महामार्ग बांधायला घेतला आहे. हाच महामार्ग सुरतपर्यंत नेणार आहे. त्याच महामार्गाला सुरतवरून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद असता रस्ता बांधणार असून यामुळे पुण्यातील ट्रॅफिक कमी होईल. तसेच पुण्यात तीन लेअरचे पूर बांधण्याचा विचार असल्याचेही गडकरी म्हणाले.