
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ससून रूग्णालयाच्या समितीने चौकशी अहवाल पुणे पोलिस प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला आहे. तनिषा भिसे यांना उपचार देतांना डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला आहे का? याची चौकशी ससून रूग्णालयाच्या समितीने केली आहे. आता दीनानाथ रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणानंतर दीनानाथ रूग्णालयाविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्तांची समिती आणि महापालिका आरोग्य विभागाची माता-मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यात आली होती. या समित्यांनी चौकशी करून अहवाल राज्य सरकारला सादर केले आहेत. त्यानंतर ससून रूग्णालयाच्या समितीमार्फत दीनानाथ रूग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ या रुग्णालयांमध्ये तनिषा भिसे यांच्यावर उपचार करताना निष्काळजीपणा झाला आहे का? याची चौकशी करण्यात आली आहे. तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ससूनच्या चौकशी अहवालानुसार याप्रकरणातील संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
n ससूनच्या समितीने प्रतिनिधीद्वारे अलंकार पोलीस ठाण्यास अहवाल पाठवला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाला ई-मेल किंवा पोस्टाने अहवाल न पाठवता प्रतिनिधी मुबंईला पाठविला आहे. ससून रूग्णालयाच्या समितीने या प्रकरणाचा चौकशी अहवाल पोलिस प्रशासनाकडे सादर केला असून, वैद्यकीय शिक्षण विभागालाही चौकशी अहवाल पाठविल्याचे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक आणि समितीचे अध्यक्ष डॉ. यल्लपा जाधव यांनी सांगितले.