
महापालिकेच्या अंदाजपत्रकात आमदार, माजी नगरसेवकांच्या पत्रानुसार सुमारे 300 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, शहरातील काही आमदारांना तसेच काही ठरावीक नगरसेवकांना झुकते माप दिले आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या तीन माजी सभागृह नेत्यांची चांदी झाली असून, त्यांनी मोठं घबाड पदरात पाडून घेतले आहे. सत्ताधारी पक्षातील इतर पदाधिकारी, नगरसेवकांना झुकते माप दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले. आमदार, माजी नगरसेवक आणि इच्छुकांकडून बजेटमध्ये 30 हजार कोटींच्या कामांची यादी दिली होती. आमदार, माजी नगरसेवकांच्या पत्रानुसार त्यानुसार प्रशासनाला योग्य वाटलेल्या सुमारे 300 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, निधी देण्यातही दुजाभाव केल्याचे समोर आले आहे.
काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात 1 ते 2 कोटीपर्यंतच्या कामांचा समावेश प्रभागनिहाय अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात आमदारांच्या पत्रानुसार 10 ते 15 कोटींपर्यंतचा निधी देण्यात आला असून, काही नगरसेवकांना 5 ते 10 कोटींचा निधी देण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका माजी सभागृह नेत्याने तब्बल 28 कोटी, दुसऱ्या सभागृह नेत्याने 22 कोटींचा निधी घेतला असून, एका पदाधिकाऱ्याच्या प्रभागात जवळपास 18 कोटींचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय कोथरूड मतदारसंघातील तीन माजी नगरसेवकांना प्रत्येकी 10 कोटींचा निधी मिळाला आहे.
भाजपच्या माजी सभागृह नेत्यांनीच केला माजी नगरसेवकांचा घात
यंदाचा अंदाजपत्रकात मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल असे आश्वासन दिल्याने यंदाचे अंदाजपत्रक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विरोधकांनीही भाजपछाप अंदाजपत्रकाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, भाजपने माजी नगरसेवकांना अंदाजपत्रकात निधीची तरतुदीच्या याद्या माजी सभागृह नेत्यांकडे देण्यास सांगितल्या. मात्र, माजी सभागृह नेत्यांकडे आलेल्या याद्यांनुसार माजी नगरसेवकांना निधी देण्याऐवजी स्वतःच्या प्रभागात निधी पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. भाजपच्या माजी सभागृह नेत्यांनीच | माजी नगरसेवकांचा घात केल्याचे बोलले जात आहे.