सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, आदी मागण्या सकल मराठा समाज अखिल नवी पेठ, सदाशिव पेठ विभागातर्फे करण्यात आल्या.
सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे नवी पेठ येथील गांजवे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी अनंत घरत, प्रसाद काकडे, संजय साळवी, सूर्यकांत पवार, अमित काळे, निरंजन गुंजाळ, अनिकेत गायकवाड, कामिनी मेमाणे, मंजुषा देशमुख, मिलन पवार, दिलीप बेंद्रे, केदार मानकर, मुकुंद ढमाले आदी उपस्थित होते.
देशमुख हत्या प्रकरणात अद्याप वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली नाही. कराडला तत्काळ अटक करावी, गुह्यातील दोषींना फाशी द्यावी, मुंडे यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, राज्यात हत्या, महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सामान्य माणसांच्या मनात भीती आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात असमर्थ ठरलेले मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
शासनाने गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्यांचा योग्य बंदोबस्त करू, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी महिलांनी दिली. तर शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली नाही तर संपूर्ण ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन करण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. या वेळी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मुंबईसह राज्यात निदर्शने
बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटले आहेत. मुंबईतही संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी निदर्शकांनी केली. राज्यातील लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे मोर्चे निघाले आणि देशमुख यांना न्याय मिळावा, अशी मागणी मराठा समाजाने काढलेल्या मोर्चात करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येबद्दलचा संताप या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो लोकांमध्ये दिसून आला.