Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणार्‍याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच चोरलेले मंगळसूत्र विकण्यासाठी आरोपीने ज्या मित्राकडे दिले त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

किशोर अशोक पवार आणि ओंकार रमेश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पवार आणि चव्हाण दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यातील चव्हाणवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून आरोपीने मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा विश्रांतवाडी पोलिसांनी शोध घेतला.

तांत्रिक तपासावरून पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, अंमलदार अमजद शेख, संजय बादरे यांच्या पथकाने संशयित आरोपी किशोर पवारची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच मित्र ओंकार चव्हाण याच्याकडे मंगळसूत्र विकण्यासाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.