पिझ्झा हा फक्त जगभरातील अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. पिझ्झा तुम्हालाही आवडत असेल तर सावधान..! ही बातमी वाचल्यावर पिझ्झा खावा की नाही, असा विचार तुम्ही नक्कीच कराल. आपला आवडता खाद्यप्रकार असला तरी तो खाताना योग्य ती काळजी घ्यायलाच हवी.
पिंपरी चिंचवडमध्ये एका पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पिझ्झाप्रेमींना धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणीनगर मध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला आढळल्याचा प्रकार घडला आहे. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने याबाबत अन्न प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
अरुण कापसे याांनी कुटुंबीयांसाठी जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झामधून पिझ्झा ऑर्डर केला होता. आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झा खात असताना अचानक अरुण कापसे यांच्या दाताला काहीतरी टणक वस्तू जाणवली. त्यांनी नीट पाहिले असता ती टणक व्सतू म्हणजे चाकूचा तुटलेला तुकडा होता. यानतंर अरुण कापसे यांनी डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, सुरुवातीला त्यांना डॉमिनॉज पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मॅनेजरने घरी येऊन पिझ्झामधील तुटलेला चाकूचा तुकडा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला.
या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेचच परत करण्यात आले. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झाविरोधात अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासोबतच अरुण कापसे यांनी नागरिकांना कोणतीही वस्तू खाताना जपून खावी, असाही सल्ला दिला आहे.