कौटुंबिक वादातून शिलाई मशिनच्या कात्रीने पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. खराडी येथील तुळजाभवानी नगरमध्ये ही घटना घडली. ज्योती गिते असे मयत पत्नीचे तर शिवदास गिते असे आरोपी पतीचे नाव आहे.
शिवदास हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात टंकलेखक म्हणून कार्यरत होता. शिवदास 15 जानेवारी रोजी झालेल्या एका परिक्षेत नापास झाला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते. ज्योती त्याला पुन्हा परीक्षा देण्यासाठी सांगत होती. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होता. ज्योती शिवणकाम आणि धुण्या-भांड्याची काम करत होती.
शिवदास आणि ज्योती मूळचे बीड जिल्ह्यातील असून कामानिमित्त पुण्यात राहत होते. दोघांना पाच वर्षाचा मुलगा आहे. बुधवारी पहाटे पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन शिवदासने ज्योतीची शिलाई मशिनच्या कात्रीने वार करून हत्या केली. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ बनवला.
पत्नीची हत्या केल्यानंतर शिवदास स्वतः चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी शिवदासला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.