तब्बल 47 कोटी 43 लाखांची मिळकतकर थकबाकी; सिंहगड कॉलेजचे मुख्य कार्यालय पालिकेकडून जप्त

महापालिकेने पालिकाहद्दीतील थकीत मिळकतकर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्ड-बाजा वाजविल्यामुळे लोक थकबाकी भरत आहेत. मात्र, पालिकेच्या मिळकतकर विभागाने सुमारे 47 कोटी 43 लाख रुपयांची थकबाकी न भरल्याने सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेच्या तीन मिळकतींचा ताबा घेतला आहे. 30 दिवसांत मिळकतकर न भरल्यास संबंधित मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बॅण्ड-बाजा वाजवीत थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे महापालिकेच्या तिजोरीत चार दिवसांत 11 कोटी 19 लाख 11 हजार 612 रुपये थकबाकी जमा झाली. गुरुवारपर्यंत 23 मिळकती सील केल्या. आता मिळकत कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांची वसुली सुरू केली आहे.

मिळकतीसमोर बॅण्ड वाजवूनच कार्यवाही केली जात आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कोंढवा, एरंडवणा, वडगाव-धायरी येथील महाविद्यालये, शाळा आदी मिळकती आहेत. या मिळकतींचा कर अनेक वर्षांपासून थकीत आहे. या थकीत मिळकतकराच्या वसुलीसाठी शुक्रवारी कारवाई केली गेली.

उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘सिंहगड इन्स्टिट्यूटची मुख्य प्रशासकीय इमारत एरंडवणा येथे असून, या ठिकाणी सर्व थकीत मिळकतींची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. यासंदर्भातील सर्व पंचनामे केले आहेत. कर भरण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.’

मिळकती जप्त करून लिलाव करणार

थकबाकी वसुलीची मोहीम जोरदार राबविण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात सुमारे 14 लाख 80 हजार मिळकती असून, त्यांपैकी सुमारे आठ लाख 74 हजार 546 मिळकतधारकांनी मिळकतकरापोटी 1804 कोटी इतका मिळकतकर पालिकेकडे जमा केला आहे. उर्वरित मिळकतकर थकबाकीधारकांकडे यापुढील काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुलीसाठी नियुक्त पथकांमार्फत मिळकतकर वसुलीचे काम करण्यात येत आहे. थकीत मिळकतधारकांच्या मिळकती जप्त केल्या जाणार आहेत. त्यानंतर 30 दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास त्या मिळकतींचा लिलाव केला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.