
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना वाकड परिसरात घडली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी वाकड पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी फरार आरोपीला त्याच्या गावातून अटक केली आहे. वाकड परिसरातील काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रोडवरील धनगरबाबा मंदिराजवळ ही घटना घडली.
बाळू विठ्ठल साळवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अली अन्सारी असे मयताचे नाव आहे. आरोपी आणि मयत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. तसेच दोघेही पेंटर होते.
अलीचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा बाळूला संशय होता. याच संशयातून बाळूने अलीची सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून हत्या केली. यानंतर बाळूने थेट गाव गाठले. धनगरबाबा मंदिराजवळ एक व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात चौकशी केली असता मृत व्यक्ती पेंटर अली अन्सारी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे 12 तासात गुन्ह्याची उकल केली. तपासात बाळू साळवे यानेच अलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बाळूचा शोध सुरु केला. तांत्रिक माहितीच्या आधारे बाळू बीड येथे आपल्या मूळगावी असल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी बीड गाठत बाळूच्या मुसक्या आवळल्या.