जीबीएसचे पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन भरवले पेढे

पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना बरे होणाऱया रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. ससून रुग्णालयातील पाच रुग्णांनी जीबीएसवर मात केली असून बरे झालेल्या रुग्णांना रविवारी डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवले आणि घरी सोडले.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते बरे झालेल्या रुग्णांना पुष्पगुच्छ देण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव, डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. एच. बी. प्रसाद उपस्थित होते.

दरम्यान, पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र आता या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ससून रुग्णालयात जीबीएसबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून सध्या ससूनमध्ये जीबीएसबाधित 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जीबीएसचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबाबत काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे, मात्र आपल्याकडचे पाच रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने दिलासा मिळाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये बरे होत आलेल्या दहा रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.

या आजारावर त्वरित उपचार सुरू केल्यास शंभर टक्के रुग्ण बरा होतो. लक्षणे दिसून आल्यानंतर आठ-दहा दिवसांनंतर उपचार सुरू केल्यास काही प्रमाणात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे लक्षणे दिसल्यास वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

रुग्णसंख्या 158, तर 38 जण झाले बरे

आतापर्यंत एकूण संशयित रुग्णांची संख्या 158 वर गेली आहे. यात पुणे महापालिका हद्दीतील 114, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 18, जिह्याच्या ग्रामीण भागातील 18 रुग्णांचा समावेश आहे. 8 रुग्ण इतर जिह्यांतील आहेत. आतापर्यंत 38 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 48 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तसेच 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे आरोग्य विभागाने अहवालात म्हटले आहे.