पैशाच्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना पुण्यातील उरुळी कांचनमध्ये घडली आहे. या घटनेत सदर व्यक्ती जखमी झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले. काळूराम गोते असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर दशरथ शितोळे असे आरोपीचे नाव आहे.
उरुळी कांचनमधील इनामदार वस्तीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शितोळे यांच्या घरासमोर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पीडित काळूराम गोते हे जमिनीच्या व्यवहारासाठी दशरथ शितोळे यांच्या घरी गेले होते. व्यवहार सुरू असताना पैशावरून दोघांमध्ये खटके उडाले. याच कारणातून रागाच्या भरात शितोळे यांनी गोते यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यात गोते जखमी झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.