
पिंपरी चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सचिन दत्तू नढे आणि विनोद जयवंत नढे अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तू नढे आणि विनोद जयवंत नढे यांच्यासह चौघेजण काळेवाडी पेट्रोल पंपासमोरील एका हॉटेलमध्ये बसले होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर अचानक फटाका फुटल्यासारखा आवाज आला. हॉटेलचे मॅनेजर तुषार भोजवानी यांनी तात्काळ पहिल्या मजल्यावर धाव घेऊन पाहिले असता सचिन गढे यांच्या हातात रिव्हॉल्वर होते.
सचिन नढे याने हॉटेलमधील सर्विस टेबलवर गोळी झाडली. ही गोळी टेबलमधून आरपार गेल्याने टेबलाला छिद्र पडले. गोळीबार होताच हॉटेलमधील इतर ग्राहक घाबरून पळून गेले. याप्रकरणी हॉटेल मालकाने वाकड पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) माजी नगरसेवक विनोद नढे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, गोळीबार का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. वाकड पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.