Pune News – चूल पेटवण्यासाठी लाडक्या बहिणींचा वणवण; गॅसचे दर कमी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना 100 रुपयात घरगुती गॅस कनेक्शन दिले. परंतु मोल मंजुरी करणाऱ्या महिलांना महिन्याला भरलेल्या गॅस टाकीसाठी आठशे रुपये मोजावे लागत आहेत. गॅसच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गरीब कुटुंबातील महिलांवर झाडांचा काड्या-कुड्या (सरपन) गोळा करून चुली पेटवण्याची वेळ आली आहे.

अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक तसेच तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मोलमजुरी करत कुटुंब चालवावे लागते. तर पूर्व भागात अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर फाटा, पारगाव, मंचर, घोडेगाव एकलहरे येथील अनेक महिला मंगल कार्यालयात रोजंदारीवर वऱ्हाडी मंडळींना वाढण्याचे काम करत आहे. यावर आपला प्रपंच चालविण्याचा अनेक कुटुंब प्रयत्न करत आहेत. घरगुती गॅसच्या टाकीची किंमत 805 रुपये इतकी असल्याने या महिलांना वेळेत गॅस टाकी घेण्यासाठी जवळ पैसे नसतात. त्यामुळे अनेक महिला आता पुन्हा आपल्या घरातील चुली पेटवू लागल्या असून त्यासाठी वेळ काढून रानावनातील झाडांचा लाकूडफाटा गोळा करताना दिसत आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 100 रुपयात एक भरलेली टाकी, शेगडी, पाईप, रेगुलेटर दिले त्यानंतर भरलेल्या गॅसच्या टाकीची किंमत वाढत गेल्याने गरीब कुटुंबांना भरलेली टाकी घेणे आता शक्य होत नाही. त्यामुळे महिला आता दिवसभर फिरून लाकूडफाटा गोळा करून चुली पेटवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पाचशे रुपयात भरलेली टाकी द्यावी अशी मागणी महिला करत आहेत.