
दीनानाथ रूग्णालयातील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे आणि पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. याच संदर्भात आज पहिल्यांदाच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र यावेळी डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तर न देताच पत्रकार परिषद गुंडाळली. वारंवार तेच प्रश्न विचारात असं म्हणत ते पत्रकार परिषदेतून निघून गेले. यावेळी पत्रकारांनी त्यांना उत्तर न देता जाणं योग्य नाही, असं वारंवार म्हटलं. मात्र ते थांबले नाही.
याआधी तनिषा भिसे प्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. धनंजय केळकर म्हणाले की, “आगोदर दीनानाथ रुणालयात डिपॉझिट घेत नव्हते. मात्र पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढल्याने लोकही लांबून आमच्याकडे यायला लागले. त्यामुळे ज्या रुग्णांच्या उपचारासाठी जास्त पैसे लागणार होते, त्यासाठी अनामत रक्कम घेतली जाऊ लागली.” ते पुढे म्हणाले, “भिसे यांचा मला दुपारी 2 वाजेदरम्यान कॉल आला होता. तसेच मी भिसे यांना दोन ते अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले होते. रुग्णालय प्रशासन माझा शब्द डावलणार नाही, असेही मी त्यांना सांगितले होते. पुढे काय झाले, याची मला कल्पना नाही”, असंही ते म्हणाले.