
शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) अन्न व नागरी पुरवठा विभागाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी मोठे दिव्य पार करावे लागत आहे. सन 2011 साली आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र त्यावेळी घेतलेला आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्याने केवायसी करत असताना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे छायाचित्र बदलण्यासाठी आधार सेंटरवर लांबलचक रांगा लागल्याचे इंदापूरमध्ये पहायला मिळतेय.
शासनाने मेरा ई-केवायसी हे मोबाईल ॲप दिले आहे. मात्र याच्यावर प्रक्रिया करत असताना अनेक शिधापत्रिका धारकांचे आधार कार्डवरील फोटो व सध्याचा फोटो यामध्ये अनेक फरक असल्याने अनेक शिधापत्रिका धारकांची आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया होत नाही. त्यातच आधार कार्डवरील फोटो बदल करायचा असल्यास तो वेळेवर होत नाही.
अनेक शिधापत्रिकाधरक हे अशिक्षित असल्याने त्यांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ससेहोलपट होत आहे. रेशन वितरकाकडून कोणतीही मदत या शिधापत्रिकाधारकांना होताना दिसत नाही. ही केवायसी प्रक्रिया अन्न नागरी पुरवठा यंत्रणेकडून आणि रेशन वितरकाकडून करण्यात यावी अशी मागणी शिधापत्रिकाधारक करीत आहेत.