नववर्षांच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असून, 31 डिसेंबरला पार्टीच्या अनुषंगाने विविध पबवाल्यांकडून तरूणाईला आकर्षित केले जात आहे. मात्र मुंढव्यातील एका पब चालकाने नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रणासोबत ग्राहकांना चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीट पाठवले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (प्रसारमाध्यम विभाग) अध्यक्ष अक्षय जैन यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
पुण्यातील मुंढवा हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठविली आहे. त्यामध्ये कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमजासह चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे. पुणे हे देशाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यात पब्लिसिटीच्या नावाखाली केल्या जाणाऱया अशा कृत्यांमुळे शहराच्या प्रतिमेला तडा जातो. आम्ही पुणे शहरातील युवकांच्यावतीने याला विरोध करतो. प्रकरणाची चौकशी करून, कॅफे व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जैन यांनी केली आहे.