
आयटी अभियंत्याला मारहाणप्रकरणी पुख्यात गजा मारणे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. दरम्यान, अंतर्गत कारवाईच्या भीतीपोटी गजा मारणे हा सोमवारी संध्याकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात शरण आला. त्याची वकिली करण्यासाठी आलेल्याला पोलिसांनी पिटाळून लावले. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. मारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती डीडीआर करून त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागविली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
कोथरूड परिसरात पुख्यात गजा मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना 19 फेबुवारीला घडली होती. पोलीस आयुक्त अमितेश पुमार यांनी तातडीने प्रकरणाची दखल घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल, तापकीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार पसार झाला आहे. या चौघांविरुद्ध यापूर्वी गंभीर गुह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांनी फिर्याद नोंदवली आहे.
मारहाण प्रकरणात टोळीचा म्होरक्या गजा मारणे याला अटक करण्यात आली. यातील आरोपींसह गुह्यासंदर्भात 74 ठिकाणी घरांची झडती घेतली. आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी कागदपत्रांची मोठय़ा प्रमाणावर पूर्तता केली. पूर्ण ताकदीने या केसचा तपास सुरू आहे. मोबाईल ट्रेपिंग, ट्रफिक कॅमेरे याद्वारे तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश पुमार यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारींसाठी स्पेशल डेस्क
नागरिकांनो, मारणे टोळीसह इतर कोणत्याही गुंड टोळ्यांविरुद्ध आपली तक्रार असल्यास घाबरू नका. संबंधित तक्रार पोलीस आयुक्तालयातील स्पेशल डेस्ककडे करा. त्यासाठी गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती केली आहे. तक्रारदार नागरिकांची सुरक्षा आणि गोपनीयता ठेवण्याची आमची जबाबदारी असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.