
घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्याने पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी (24 रोजी) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. सुजल संजय मनकर (वय 21, रा. राजगुरूनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी याबाबत माहिती दिली.
सुजल हा डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात ‘बीसीएस’ अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्याने सोमवारी सायंकाळी संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावर प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. तेथील एका डक्टमधून त्याने थेट खाली रस्त्यावर उडी मारली. रस्त्यावर पडल्यावर त्याला एका कारने चिरडले.
स्थानकावरील नागरिकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला. त्यानंतर त्याला तातडीने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, सुजल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.