वरंधा घाटात कार दरीत कोसळली, एकाचा मृत्यू; 8 जण जखमी

महाडहून भोरच्या दिशेला जाणारी कार पुण्यातील वरंधा घाटात दरीत कोसळली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. शुभम शिर्के (22) असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण पुण्यातील रहिवासी असून कात्रजमधील एका कंपनीत कामाला होते. सर्वजण रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे पिकनिकला गेले होते. पिकनिकहून परतत असताना वरंधा घाटात उंबर्डेवाडीजवळ अवघड वळणावर कार 100 फूट दरीत कोसळली.

मंगेश गुजर (26), आशिष गायकवाड (29), सिद्धार्थ गंधणे (26), सौरभ महादे (22), गणेश लवंडे (27), अमोल रेकीणर (27), यशराज चंद्र (22) आणि आकाश आडकर (25) अशी जखमींची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस आणि सह्याद्री बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना दरीतून बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.