Pune News : आंबेगाव तालुक्यात मधमाशांचा शेतकऱ्यांवर हल्ला, दोनजण गंभीर जखमी

बटाटा लागवड करत असताना मधमाशांच्या थव्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंबेगाव तालुक्याती कुरवंडी गावात घडली. येथील शेतकरी रवींद्र तोत्रे, बबन मारूती तोत्रे यांची नेहरमाळा येथे शेती आहे. शुक्रवारी ते कुटुंबासमवेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने बटाटा लागवड करत होते. सकाळी नऊ वाजल्यापासून दीपक तोत्रे, सुदर्शन तोत्रे, धनेश तोत्रे, विशाल तोत्रे हे बटाटा लागवड करत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास बटाटा लागवड करत असताना अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशांचा थव्याने बटाटा लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात बाकीचे शेतकरी पळून गेल्याने बचावले. ज्येष्ठ नागरिक बबन मारुती तोत्रे (वय 65) व त्यांचा मुलगा दीपक बबन तोत्रे (वय 40) यांच्यावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. वय झाले असल्याने बबन तोत्रे यांना पळून जाता आले नाही व ते खाली जमिनीवर पडून राहिले. त्यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतला आहे. तर त्यांचा मुलगा दीपक यालाही मधमाशांनी चावा घेतला. अंधार पडल्याने माशा निघून गेल्यानंतर सत्यवान तोत्रे, सोमनाथ तोत्रे यांनी बबन तोत्रे व दीपक तोत्रे यांचा शोध घेऊन त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बबन मारुती तोत्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून दीपक बबन तोत्रे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.