राज्यात पैसे वाटून, आमदार फोडून निवडणुका जिंकल्या जात आहेत, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव म्हणाले आहेत. पुण्यात आज महायुती सरकारविरोधात राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बाबा आढाव असं म्हणाले आहेत.
बाबा आढाव म्हणाले की, ”गेल्या महिन्यात मी तीन दिवसांचं उपोषण केलं. त्यावेळी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने मी विषय मांडला. त्याचाच हा पुढचा भाग आहे. आज राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने आम्ही लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर बसलेलो आहोत. याचं कारण म्हणजे लोकमान्य टिळक यांनी त्यावेळच्या सरकारला प्रश्न विचारला होता की, तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का? आम्हाला असं वाटतं, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हालाही सरकारला तोच प्रश्न विचारायचा आहे. उत्तर आम्हाला माहित आहे. हे सरकार उत्तर देणार नाही.”
आढाव म्हणाले, ”दोन गोष्टी आहेत, जबाबदार नागरिक म्हणून मी केलेल्या मतदानाची जर थट्टा होत असेल तर, मला नाइलाजाने म्हणावं लागतं, हाय हाय ईव्हीएम हाय. दुसरी गोष्ट म्हणजे, आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो त्याला ते (महायुती सरकार) उत्तर देत नाही. अशा वेळेला गप्प बसायचं का? महाराष्ट्राचं सरकार कोट्यवधी रुपयांचा धुराळा उडवून, आमदारांना फोडून त्यांना तिथे (गुवाहाटी) नेऊन महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आज प्रश्न असा आहे की, अशा प्रकारचे व्यवहार होत असतील तर, आम्हाला कळलं पाहिजे पैसे कुठून आणले.”
बाबा आढाव पुढे म्हणाले, ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरळ सांगतात, मी दोन राजकीय पक्ष फोडले आणि सरकार बदललं. यातच त्यांनी पैसे कुठून आणले, याचा हिशोब आम्हाला कळला पाहिजे. हाच प्रश्न आम्ही लावून धरला आहे. आता अशी वेळ आहे की, लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि या सरकारला जाब विचारला पाहिजे. तसेच उत्तर मिळालं नाही तर, जेलभरो आंदोलनाची तयारी केली पाहिजे.”