Pune News : आंबेगावात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या, सरकारने स्पष्टीकरण द्यावे; अमोल कोल्हे यांची मागणी

आंबेगाव पूर्व भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केली आहे.

मंचर येथील शरद पवार सभागृहात आज खासदार कोल्हे यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आजच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सर्वसामान्य नागरिक नेत्याशिवाय अथवा शिफारशी शिवाय समस्या घेऊन आले होते. प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा दुवा जनता दरबार आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला जनता दरबार सुरू ठेवणार आहे.” अस कोल्हे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलीस यासंदर्भात अनेक समस्या आल्या आहेत. शंभर अधिकारी उपस्थित होते, त्यांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली आहे. या भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार चौकशीची मागणी करूनही समर्पक उत्तर दिले जात नाही. याबाबत मी पत्र दिले होते. प्रशासनाने त्याबाबत अद्याप गांभीर्याने दखल घेतली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोललो असता त्यांच्याकडून कारवाई करू असे सांगितले आहे. ग्रामीण भागात अनोळखी ड्रोनमुळे भयान वातावरण निर्माण झाले असून सदर ड्रोन कशासाठी वापरले जातात याचे निवेदन व स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी विधानसभेत द्यावे.” अशी मागणी अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.